फुलंब्री तालुक्यातील किनगाव हे आज आदर्शगाव म्हणून ओळखले जाते. या प्रवासाची गंगोत्री आहे अनुराधाताई चव्हाण यांचे नेतृत्व आणि श्री. अतुल चव्हाण यांची सामाजिक प्रेरणा.
किनगावच्या विकासासाठी सप्तसूत्री तत्त्वांचे काटेकोर पालन करण्यात आले. श्रमदान, लोटाबंदी, कुर्हाडबंदी, चराईबंदी, नसबंदी, नशाबंदी आणि बोअरवेल बंदी या नियमांमुळे गावात पाण्याची पातळी वाढली, बारमाही शेती सुरू झाली आणि गावकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले.
याशिवाय जलसंधारणाच्या उपक्रमांतून ४५०० मीटर CCT, ४० दगडी बंधारे, गॅबियन व माती नाला बंधारे उभारण्यात आले. ३ कोटी लिटर क्षमतेचा बंधारा गावाची ओळख बनला. १० हजाराहून अधिक वृक्षलागवडीमुळे परिसर हिरवागार झाला.
ग्रामविकासात रोजगार निर्मितीवरही भर देण्यात आला. २६ प्रकारचे व्यवसाय सुरू करून तरुणांना गाळे भाडेकराराने देण्यात आले. यामुळे स्वावलंबनाची नवी वाट उघडली.
किनगावची कहाणी ही केवळ विकासाची नाही तर एकतेची, श्रमदानाची आणि प्रेरणेची आहे. आज किनगाव हे ग्रामीण भारतातील लोकसहभागी विकासाचे एक खरे उदाहरण ठरले आहे.
